अभिनेत्री करीना कपूर खान ही अनेकांची क्रश असेल. पण करीनाचा क्रश कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का? ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये करीनाने तिची ‘दिल की बात’ सांगितली. या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक करण वाही तिला सतत तिच्या क्रशबद्दल विचारत असतो. अखेर नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये करीनाने त्या अभिनेत्याचं नाव सांगितलं.
”आशिकी’ या चित्रपटाचा हिरो अर्थात अभिनेता राहुल रॉय हा माझा क्रश होता. त्याचा ‘आशिकी’ हा चित्रपट मी आठ वेळा पाहिला होता,” असं तिने सांगितलं. महेश भट्ट दिग्दर्शक हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये राहुल रॉय व अनू अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी तुफान गाजली होती.
बॉलिवूडची ‘सुपरमॉम’ अर्थात करीना सध्या तिच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. एकीकडे ती ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदी आहे तर दुसरीकडे ती लंडनमध्ये आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट हातात असताना ती आईचीही भूमिका तितक्याच कुशलतेने पार पाडताना दिसत आहे.