बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकामुळे बरीच चर्चेत आलीय. नुकतंच करीनाने तिचा बेस्ट फ्रेंड फिल्ममेकर करण जोहरसोबत इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह सेशन केलं. यात पुन्हा एकदा तिने आपलं पुस्तक आणि प्रेग्नंसीबाबत नवा खुलासा केलाय. अभिनेत्री करीनाने पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनीस्ट’ आमिर खानसोबत रोमॅण्टिक सीन शूट केल्याचा खुलासा या लाइव्ह सेशनमध्ये केलाय.
होय, तुम्ही जे वाचलंत ते खरंय. नुकतंच अभिनेत्री करीना कपूर फिल्ममेकर करण जोहरसोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली होती. यावेळी तिने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या. यावेळी बोलताना करीना म्हणाली, “मी जेव्हा पाच महिन्यांची प्रेग्नंट होती, त्यावेळी आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचं शूटिंग केलं होतं. इतकंच नाही तर एका खास सीनसाठी मी आमिर खानसोबत एक रोमॅण्टिक सीन देखील शूट केला होता. ते एका स्पेशल गाण्याचं शूट होतं. यात आम्हा दोघांना रोमान्स करायचा होता.”
View this post on Instagram
करीनाबद्दल आमिर म्हणाला….
एका माध्यमाला मुलाखत देताना अभिनेता आमिर खान करीना कपूरला चिडवत म्हणाला होता की, “आम्ही शूटिंग दरम्यान करीना आणि करोना दोघांना झेललं आहे.” करीनाने तिच्या प्रसुतीपूर्वीच सगळी काम आटोपून घ्यावीत, अशी आमिरची इच्छा होती. करीनाने तिचं काम पूर्ण केलं होतं. सध्या या चित्रपटासाठी लदाखमध्ये एका युद्धाच्या सीनचं शूटिंग सुरूय. हे शूट ४५ दिवस सुरू असणार आहे. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट टॉम हॅंक्स यांच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात नागा चैतन्य बुब्बाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
अभिनेत्री करीना कपूर तिच्या प्रेंग्नसीमध्ये काम करत असल्यामुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ज्यावेळी करीना तैमूरच्यावेळी प्रेग्नंट होती, त्यावेळी सुद्धा ती प्रेग्नंसीदरम्यान शूटिंग आणि कामामुळे चर्चेत आली होती.
अभिनेत्री करीनाने तिच्या ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकाच्या माध्यमातून एका लेखिकेच्या भूमिकेत डेब्यू केलंय. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने आपल्या दोन्ही वेळच्या प्रेग्नंसी दरम्यानच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. पहिल्या प्रेग्नंसीदरम्यान ती थोडी घाबरलेली होती, पण दुसऱ्या प्रेग्नंसीच्या वेळी मात्र तिला कोणतीच भिती वाटली नाही, असं देखील करीनाने सांगितलं. या काळातल्या सर्व गोड-कडू आठवणी तिला आपल्या चाहत्यांसोबत शेअर करायच्या आहेत. करीनाचं हे पुस्तक आता अॅमेझॉनवर सुद्धा उपलब्ध झालं आहे.