अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरचा नुकताच पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. वडिलोपार्जित पतौडी पॅलेस येथे साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खान आणि कपूर कुटुंबातील काही मोजकेच लोक या सेलिब्रेशनला उपस्थित होते. तैमुरला पहिल्या वाढदिवसासाठी कोणकोणत्या भेटवस्तू मिळाल्या याविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली होती. खरंतर कोणीही कल्पना करू शकणार नाही, अशी एक खास भेट तैमुरला मिळाली आहे. करिनाची आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने एक जंगलच तैमुरला भेट दिले आहे.
मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनावेमधील एक लहानसे जंगल तिने तैमुरला दिले असून तिच्या इन्स्टाग्रामवर याविषयी तिने माहिती दिली आहे. एक हजार चौरस फूट जमिनीवर पसरलेले हे जंगल आहे. ज्यामध्ये १०० वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. ‘लहान मुलांना पक्षी, फुलपाखरे, फुले पाहणे आवडते. त्यामुळे मी विविध पक्षी आणि फुलपाखरांनी भरलेले एक लहानसे जंगल त्याला भेट म्हणून दिले आहे. जेव्हा तो मोठा होईल, तेव्हा या जंगलात बहरलेले वृक्ष पाहून तो आनंदित होईल, अशी मी आशा करते,’ असे ऋजुताने इन्स्टाग्रामवर लिहिले.
वाचा : ‘डार्लिंग’ प्रभासविषयी श्रद्धा म्हणते…
छोट्या नवाबच्या या जंगलात ३ जांभळाची, १ फणसाचे, १ आवळ्याचे, ४० केळींची, १४ शेवग्याची झाडे आहेत. याशिवाय सीताफळ, रामफळ या फळझाडांसह मिरची, हळद, लसूण आणि काही फुलांचीही झाडे आहेत. या जंगलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीच्या कल्पनेतून प्रेरणा घेऊन साकारण्यात आले. ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या ‘झिरो बजेट’ या कल्पनेतून प्रेरणा घेत ऋजुताने हा सामूहिक शेतीचा प्रकल्प सुरू केला आहे. यात तुम्ही स्वत:च्या नावावर वनशेती घेऊ शकता आणि त्यावर शेतीही करू शकता.