स्वत:ला फिट अँड फाइन ठेवण्यासाठी सेलिब्रिटी बरीच मेहनत घेत असतात. यासाठी ते तासनतास जिममध्ये घाम गाळताना दिसतात. सोशल मीडियावर याचे बरेच पुरावे मिळतात. कारण सेलिब्रिटी वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अभिनेत्री करिना कपूर खानसुद्धा तिच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे कायम चर्चेत असते. मात्र यामुळेच सध्या तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. सोशल मीडियावर करिनाच्या एका फोटोवर नेटकऱ्यांकडून टीका होत असून अनेकांनी तिला पोषक आहार खाण्याचे सल्लेदेखील दिले आहेत.

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी करिनाने सिंगापूरमध्ये रॅम्प वॉक केलं. या रॅम्प वॉकनंतर तिची मैत्रिण अमृता अरोराने करिनासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. याच फोटोवर अनेकांनी टीका केली आहे. ‘हा तर सांगडा आहे,’ असं एका युजरने म्हटलं तर काहींनी तिला भरपूर खाण्याचा सल्ला दिला. करिना त्या फोटोमध्ये कुपोषित दिसत असल्याची टीकाही एकाने केली.

वाचा : ‘टी सीरिज’सोबत अक्षय पुन्हा कधीच काम करणार नाही?

तैमुरच्या जन्मानंतर करिना आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून पुनरागमन करतेय. यासाठी तिने जिममध्ये घाम गाळून २० किलो वजनदेखील कमी केलं. याआधी २००८ मध्ये ‘झिरो साइज फिगर’मुळे करिना चर्चेत आली होती. त्यावेळी तिच्या आरोग्यावरही परिणाम झाल्याच्या चर्चा होत्या. आता या ट्रोलिंगवर करिना नेटकऱ्यांना काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.