‘पद्मावती’ या चित्रपटावर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी २७ जानेवारी रोजी चित्तोडगडावर जमण्याचे आवाहन राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी यांनी केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या वादग्रस्त चित्रपटाला राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.
‘२७ जानेवारीला राजपूत संघटनांचे सदस्य चित्तोडगडावर एकत्रित येऊन राणी पद्मावतीने दिलेला बलिदान व्यर्थ गेला नसल्याचा संदेश देणार आहेत. चित्रपटावर बंदी आणण्याच्या आमच्या मागणीचे समर्थन करणाऱ्यांनी चित्तोडगडावर जमावे,’ असे कालवी पत्रकार परिषदेत म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सहा सदस्यीय समितीने सुचवलेल्या काही गोष्टींकडे सेन्सॉर बोर्डाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘चित्रपटातील काही गोष्टींमुळे राजपूत आणि मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे समितीने सेन्सॉर बोर्डाला सांगितले. पण सेन्सॉरने याकडे दुर्लक्ष केले. आता केंद्र आणि राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणून सर्वांसमोर उदाहरण सादर करावे. दिग्दर्शक भन्साळी यांनी सुरुवातीला चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे सांगितले. मात्र, नंतर काल्पनिक असल्याचे सांगितले. नेमके काय आहे हे त्यांनी आजवर स्पष्ट केले नाही,’ असे ते पुढे म्हणाले.
बऱ्याच वादांनतर या चित्रपटाच्या नावात काही बदल सुचवत आणि काही दृश्यांवर कात्री लावत सेन्सॉरने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय ३० डिसेंबर रोजी घेतला होता. पण, सेन्सॉरची ही भूमिका करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मुळीच पटली नसून त्यांनी चित्रपटाच्या विरोधातील आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ‘पद्मावती’विषयी सुरु असणारा वाद पाहता येत्या काळात ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार का, याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.