‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असली तरीही काही गोष्टींच्या बाबतीत मात्र तणावाची परिस्थिती कायम आहे. सेन्सॉर बोर्डाने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देत हिरवा कंदील दाखवला. पण, करणी सेनेचा चित्रपटाला असणारा विरोध तिळमात्रही कमी झालेला नाही. सध्याच्या घडीला शक्य त्या सर्व परिंनी ‘पद्मावत’च्या वाटेतील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही भन्साळींच्या या चित्रपटामागचे शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये.

२५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावत’चे स्क्रिनिंग केल्या जाणाऱ्या चित्रपटगृहांमध्ये तोडफोड करण्याचा इशारा करणी सेनेने दिला. त्यानंतर करणी सेनेने भन्साळी यांच्यासोबत सामंजस्याने चर्चा करत या मुद्द्यावर तोडगा काढण्यासही साफ नकार देत चित्रपट प्रदर्शित झाला तर ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचा इशारा दिला आहे. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. ‘राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील कोणत्याच प्रेमप्रसंगाचे चित्रण करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण आम्हाला सुरुवातीपासूनच हवे होते. या एका स्पष्टीकरणानेच आमचे समाधान झाले असते. मात्र आता आम्हाला कोणत्याही प्रकारची सामंजस्यपूर्ण चर्चा करण्याची गरजेची वाटत नाही’, असे कालवी म्हणाले.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

चित्रपटात सुचवलेले बदल आणि नावात करण्यात आलेला बदल या सर्व गोष्टींनी आमचे समाधान झाले नसल्याचेही कालवी यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच त्यांनी या चित्रपटावर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी केली. राजपूत संस्कृती आणि राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप करणाऱ्या करणी सेनेचा या चित्रपटाला होणारा विरोध दर दिवसाआड वाढतच असून, आता त्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे ‘जनता कर्फ्यू’?
‘जनता कर्फ्यू’ या प्रकारात पोलीस जमावबंदीचा आदेश देत नसून, सरकारी अधिकारी आणि नेतेमंडळी यांना एखाद्या ठिकाणी जाण्यास बंदी असते. जनता कर्फ्यू लागलेला असताना त्या ठिकाणी जायचे की नाही हे सामान्यांसाठी ऐच्छिक असते.