सध्या सर्वत्र नवरात्रींची धामधूम सुरू असताना या उत्साहाच्या वातावरणात बॉलिवूड तरी कसे मागे राहिल. अभिनेत्री कतरिना कैफही नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी चक्क केरळला पोहोचली. कल्याण ज्वेलर्सचे चेअरमन टी.एस. कल्याणरमण यांनी आपल्या घरी नवरात्रीनिमित्त एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कतरिना कैफनेही हजेरी लावली होती. यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेते मामूट्टी आणि नागार्जुनसारखी मात्तबर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमात कतरिना अगदी पारंपरिक वेशभूषेत दिसली. तर मामूट्टी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. कार्यक्रम संपेपर्यंत सर्वांची नजर ही फक्त कतरिनावरच खिळली होती. अनेक वर्षांनंतर कतरिना आणि मामूट्टी एकत्र दिसले.
फार कमी लोकांना माहिती असेल की कतरिनाने मल्याळम सिनेमातही काम केले आहे. तिने २००६ मध्ये ‘बलराम वर्सेस थारादास’ या सिनेमात मामूट्टीसोबत काम केले होते. हा एक थरारपट होता.
हे संपूर्ण वर्ष कतरिनासाठी खास होते असेच म्हणावे लागेल. कतरिनाने नुकतेच ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले. यानंतर ती आनंद एल राय यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. या सिनेमा व्यतिरिक्त ती आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’ सिनेमातही दिसणार आहे.
या कार्यक्रमात तामिळ सिनेसृष्टीकडून प्रभु गणेश आणि विक्रम प्रभू यांनीही उपस्थिती लावली होती.
‘सारेगामापा लिटिल चॅम्प’मधील प्रसिद्ध गायक वैष्णव गिरीशने आपल्या सुमधूर आवाजाने उपस्थितांची मनं जिंकली.