अभिनेत्री कतरिना कैफ सध्या माल्टामध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. ‘मी आणि निळाशार समुद्र,’ असे कॅप्शनदेखील तिने दिले आहे. आदित्य चोप्राच्या ‘यशराज फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत साकारणाऱ्या या चित्रपटात कतरिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र आता ती या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे म्हटले जात आहे.

कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोमधील तिचा हा लूक ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटासाठी असल्याची चर्चा होत आहे. याआधी ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, आमिर खान आणि अमिताभ बच्चनसुद्धा चित्रीकरणासाठी माल्टाला गेले होते. त्यावेळी त्यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोनंतर अमिताभ बच्चन, फातिमा आणि कतरिना एकत्र स्क्रिन शेअर करणार का, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातील काही अॅक्शन सीनचे चित्रीकरण माल्टामध्ये करण्यात आले आहेत. दोन महिन्यांमध्ये बांधण्यात आलेल्या एका मोठ्या जहाजावर या अॅक्शन सीनचे चित्रीकरण होणार आहे. याविषयी सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य म्हणाले की, ’18 व्या दशकातील जहाजांप्रमाणे या जहाजाची बांधणी करण्यात आली आहे. त्यासाठी परराष्ट्रातूनही काही जणांना जहाजबांधणीसाठी बोलावण्यात आले आहे.’

वाचा : दुसऱ्या दिवशीही ‘ट्युबलाइट’चा प्रकाश मंदच 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाच्या निमित्ताने फातिमा सना शेख आणि आमिर खान पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. याआधी ‘दंगल’मध्ये दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटात कतरिनाची नेमकी काय भूमिका असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ अ ठग’ या पुस्तकावर आधारित असून त्यातून एका वेगळ्या जगताची सफर घडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.