बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठ्या उत्साहात ‘केबीसी १३’ ची सुरूवात केलीय. या शोमधील प्रीमियर एपिसोडमध्ये समोर हॉट-सीटवर बसलेल्या १० स्पर्धकांचा ते परिचय करून देतात. यंदाच्या सीझनमध्ये होणाऱ्या नव्या बदलांबद्दल देखील माहिती देताना ते दिसून आले. ‘केबीसी १३’ मध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ट्रिपल टेस्ट यात नवा बदल करण्यात आला आहे. यात चार पर्यांयासह एक नव्हे तर तीन प्रश्न देण्यात येणार आहेत. तसंच लीडरबोर्डवर स्पर्धकांना या तीन प्रश्नांची उत्तर देण्यासाठी लागलेला वेळ दाखवण्यात येणार आहे. जो कमीत कमी वेळेत तीन प्रश्नांची उत्तरं देईल त्यालाच हॉट-सीटवर बोलवण्यात येणार आहे.

‘केबीसी १३’ मधील सर्वात पहिले स्पर्धक हे ज्ञान राज बनले आहेत. त्यांना शोमधील प्रीमिअर एपिसोडमध्ये हॉट-सीटवर बसण्याची संधी मिळाली. शोचे पहिले स्पर्धक ठरलेले ज्ञान राज हे झारखंड राज्यातील एका छोट्याश्या गावातून आले आहेत. तिथे ते लहान मुलांना रोबोटिक्स शिकवतात. त्यांच्या या उपक्रमात त्यांची बहीण आणि आई सुद्धा साथ देतात. ज्ञान राज यांना पहिला प्रश्न स्क्रीनवर विचारला जातो. यात त्यांना ‘थ्री इडियड्स’ चित्रपटातील एक डायलॉग पूर्ण करण्यासाठी सांगितलं जातं. याचं योग्य उत्तर देण्यात ज्ञान राज यशस्वी होतात.

१० हजार रूपयांच्या एका ऑडिओ प्रश्नासाठी त्यांनी पहिली लाइफलाइन घेतात. ‘नैनो में सपना’ हे गाणं वाजवलं जातं आणि या गाण्यातील गायकाचं नाव विचारण्यात येतं. ज्ञान राज ऑडीयन्स पोलची मदत घेतात. पण इथून येणाऱ्या उत्तरांमध्ये त्यांचं समाधान होत नाही. त्यानंतर आणखी एक लाइफलाइन वापरून ते प्रश्न बदलण्याचा पर्याय स्वीकारतात. ए. अमित कुमार, बी. उदित नारायण, सी. कुमार शानू आणि डी. बप्पी लाहिडी असे पर्याय दिले होते.

तर या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांचा लाजण्याचा अंदाज देखील पहायला मिळाला. ‘आस्क द एक्सपर्ट’ दरम्यान ऋचा अनिरुद्ध म्हणतात, “गेल्या १० वर्षापासून केवळ अमिताभ बच्चन यांना पाहता यावं आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळावी यासाठी मी या शोमध्ये येत असते.” हे ऐकून अमिताभ बच्चन लाजतात आणि म्हणतात, “मी मेकर्सकडे विनंती करतो की मला माझा चेहरा लपवण्यासाठी एखादी जागा द्या. मला फार वेगळं वाटतं जेव्हा लोक माझं कौतुक करतात.”

इस्त्रोमध्ये शिकतोय ज्ञान राज यांचा विद्यार्थी

या एपिसोडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्ञान राज यांचं भरभरून कौतुक केलं. यावेळी बोलताना ज्ञान राज यांनी सांगितलं की, ज्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर देखील जाण्याची संधी मिळाली नाही, पण राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन ते पुरस्कार देखील घेतात, अशा विद्यार्थ्यांना ते शिकवतात. केवळ अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्ञान राज यांनी कित्येक नोकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले आहेत. त्यांचा एक विद्यार्थी हा इस्त्रोमध्ये शिक्षण घेतोय, हे मोठ्या अभिमानाने सांगताना ज्ञान राज यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं.

 

आईला झाला ब्रेन हॅमरेज

ज्ञान राज यांच्यासोबत त्यांची आई आणि बहीण देखील केबीसीच्या सेटवर उपस्थित होत्या. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्ञान राज यांना इस्त्रोमध्ये शिक्षण घेण्याची देखील संधी मिळाली होती. पण त्याच वेळी त्यांच्या आईला ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांनी ती संधी नाकारली आणि आईच्या तब्बेतीकडे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. दर्शकांमध्ये बसलेली ज्ञान राज यांची आई म्हणते, “मी त्याला काम अथक प्रयत्न केल्यानंतर लगेचच फळाची अपेक्षा करायचं नाही असं वेळोवेळी शिकवलं. आपण केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळण्यासाठी त्याला कायम प्रतिक्षा करण्यासाठी सांगितलं. कारण फळासाठी प्रतिक्षा करणाऱ्यांना कायम चांगलंच हाती लागतं.” हे ऐकून महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा ज्ञान राज यांचं कौतुक केलं.

एकेकाळी इस्त्रोमध्ये शिक्षण घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या ज्ञान राज यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून गावातील इतर विद्यार्थ्यांचं इस्त्रोमध्ये जाण्याचं स्वप्न साकारण्यासाठी ते अथक परिश्रम घेतात. ‘केबीसी १३’ मधून ते ३ लाख २० रूपये इतरी रक्कम त्यांनी जिंकली आहे.