छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील डॉ. हंसराज हाथीची भूमिका वठविणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांनी काल मीरा रोडमधील वॉकहार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला असून एक उत्तम अभिनेता गमावल्याचं शल्य प्रत्येकाच्या मनात टोचत आहे. कवी कुमार यांचं अभिनयावर प्रचंड प्रेम होत आणि या प्रेमापोटीच त्यांनी केलेल्या संघर्षाचा नुकताच खुलासा झाला आहे.

मुळ बिहारचे रहिवासी असलेले कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावरही काम केले होते. अभिनेता आमिर खानच्या ‘मेला’ आणि ‘फंटूश’ या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. मात्र ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमुळे ते खऱ्या अर्थाने नावारुपाला आले. या मालिकेत डॉ.हाथीची भूमिका करणाऱ्या कवी कुमार यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. ज्याप्रमाणे कवी कुमारांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं त्याप्रमाणेच कवी कुमारांनी त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं आणि या प्रेमापोटी त्यांनी घर सोडल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

‘दैनिक भास्कर’नुसार, कवी कुमार यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. मात्र कवी कुमारांचं चंदेरी दुनियेमध्ये नशीब आजमावण्याचं स्वप्न होतं. परंतु त्यांच्या या निर्णयाचा घरातल्यांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे कवी कुमारांना घर सोडावं लागलं होतं. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कुमारांनी घरातून पळ काढला आणि थेट मुंबई गाठली. मात्र त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आणि त्यांना पाहताच तारक मेहतामधील डॉ. हाथीच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली.

दरम्यान, मुंबईत पहिल्यांदाच आलेल्या कवी कुमारांकडे एक रुपयाही नव्हता. त्यामुळे त्यांना अनेक रात्री रस्त्यावर घालवाव्या लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र डॉ. हाथीच्या भूमिकेमुळे त्यांचं नशीब पालटलं आणि एका रात्रीत ते प्रकाशझोतात आले. विशेष म्हणजे त्यांना तारक मेहता या मालिकेमध्ये सलग १० वर्ष काम केलं होतं.