छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच गाजत असलेला शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. यंदा या शोचं १२ वं पर्व असून ते चांगलंच गाजताना दिसत आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे कायमच चर्चेत असतात. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली असून दोन महिला स्पर्धकांनी यापूर्वी १ कोटी रुपये जिंकले आहेत. अलिकडेच झालेल्या भागात एका महिला स्पर्धकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर स्पर्धकाला देता आलं नाही. मात्र, हा प्रश्न सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला.

मध्य प्रदेशमधील ओशीन जेहरी या स्पर्धकाने अलिकडेच झालेल्या भागात सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्यांनी २५ लाखांचा टप्पा गाठला. मात्र, ५० लाखांच्या प्रश्नावर त्यांनी हा शो सोडला. ५० लाखांसाठी त्यांनी गिनीज वर्ल्डशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला होता.

आणखी वाचा- लग्नाआधी बिग बींनी लिहिले होते लव्ह लेटर, केबीसीमध्ये सांगितला किस्सा

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणती? असा प्रश्न या स्पर्धकाला विचारण्यात आला होता. त्याला A) ब्लू व्हेल , B) जायंट सिकोया, C) ग्रेट बॅरियर रिफ, D) हनी मशरुम हे चार पर्याय देण्यात आले होते.
या प्रश्नाचं उत्तर ओशीन यांना देता आलं नाही, त्यामुळे त्यांनी हा शो मध्येच सोडला. या प्रश्नाचं योग्य उत्तर D) हनी मशरुम हे होतं.

दरम्यान, ओशीन या कपिल शर्माच्या मोठ्या चाहत्या असून त्या कपिल शर्मा शो कायम पाहतात असं त्यांनी या मंचावर सांगितलं होतं. त्यावर तुम्ही माझा कार्यक्रम पाहत नाही का असा प्रतिप्रश्न बिग बींनी विचारला होता. त्यावर केबीसीत यावं हे माझं लहानपणापासून स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.