मुंबईत आलेल्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांत कहर केला. त्यामुळे तुंबलेले रस्ते, बंद पडलेली लोकल आणि चिखलातून वाट तुडवत घर किंवा कार्यालय गाठताना मुंबईकरांना कसरत करावी लागली. पहिल्याच पावसात मुंबईची झालेली अशी अवस्था पाहून नागरिकांसह विरोधी पक्षाने बीएमसीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

यातच लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील मिश्किल अंदाजात बीएमसीवर निशाणा साधला आहे. केदार शिंदे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विविध घडामोडींवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांत मत व्यक्त करत असतात. नुकतच केदार शिंदे यांनी एख ट्विट करत मुंबई पालिकेच्या कारभारावर टीका केलीय. “पावसाला एक अक्कल नाही. ५० मी मी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था बीएमसीने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो..” असं म्हणत केदार शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे बीएमसीच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

केदार शिंदे यांच्या या ट्वीटनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत मुंबई पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला. एक युजर म्हणाला, “त्यात नवीन काय? वर्षानुवर्षे हेच तर चालू आहे की मग ह्याच वर्षी अपेक्षा का?” तर दुसरा युजर म्हणाला, ” खरं आहे दर वेळी असाच करतो चीटिंग करता है”

भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांचे आरोप

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने विरोधकांनी देखील नालेसफाईच्या पालिकेच्या दाव्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे. नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केला. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे, नागरिकांच्या घरात घुसले आहे. नालेसफाई १०७ टक्के झाल्याचे दावे करण्यात आले असले, तरी कंत्राटांमध्ये कमिशन घेतल्याचे या परिस्थितीवरून उघड झाले आहे, असा आरोप शेलार यांनी केला.