सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या पदार्पणातील पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. केदारनाथ या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही दिसणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या सिनेमाच्या काही भागाच्या चित्रीकरणाला उत्तराखंडमध्ये सुरूवातदेखील झाली. पण जस जसे सिनेमाचे चित्रीकरण पुढे जात आहे तसे साराचे सेटवरील नखरेही वाढत जात असल्याचे म्हटले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा आपल्या लूकबाबत अधिक सजग आहे. तिला हव्या असलेल्या लूकनुसारच ती कॅमेऱ्यासमोर येणे पसंत करते. शिवाय तयार होण्यासही ती बराच वेळ घेते. तिच्या या सवयीमुळे सेटवर अनेकजण ताटकळत बसलेले असतात. हे कमी की काय ती आपल्या प्रत्येक लूकचे फोटो काढून ते फोटो एका व्यक्तीला पाठवते. त्या व्यक्तीकडून सल्ला घेऊन परत लूक बदलते. यावर दिग्दर्शक अभिषेकने स्पष्ट शब्दात तिची कानउघडणीही केली. सिनेमासाठी काय योग्य आहे, काय नाही याची दिग्दर्शकाला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे तो जे सांगेल तोच लूक अंतिम करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘केदारनाथ’ सिनेमात सारा एक उच्चभ्रू घरातील मुलगी दाखवण्यात आली आहे. तर सुशांत हा एका टुरिस्ट गाईडच्या भूमिकेत दिसणार आहे. केदारनाथ येथे येणाऱ्या आजारी भाविकांना हा गाईड आपल्या पाठीवरुन डोंगर पार करुन नेत असतो. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. अभिषेक कपूर गेल्या वर्षभरापासून या सिनेमाच्या कथेवर काम करत आहे. पुढच्या वर्षी जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल.