जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवात केतकी माटेगावकरला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या महोत्सवात चाहत्यांच्या गर्दीमुळे केतकीला मनस्ताप सहन करावा लागला होता. यामुळे केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना महोत्सव आयोजकांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, ”बहिणाबाई महोत्सव हा मोकळ्या मैदानात भरवण्यात आला होता. तेथे केतकीच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. त्यामुळे तिथे हजारों लोकांची उपस्थिती होती. अनेकदा मोठ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्याच गोष्टी आपण ठरवतो तशा होतात असे नाही. याबद्दल कलाकारांनाही पूर्ण कल्पना असते. पण कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तिकडची सुरक्षा व्यवस्था बरोबर आहे की नाही याकडे मी जातीने लक्ष देतो. संपूर्ण कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला. पण अचानक वाढलेल्या गर्दीमुळे मैदाना पलिकडे असणाऱ्या गाडीपर्यंतही जाता येत नव्हते. त्यामुळे आयोजकांना गाडी स्टेजपर्यंत आणण्याची विनंती आम्ही केली. पण गाडी स्टेजपर्यंत येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.
एवढ्या वेळात लोकांची गर्दीही चांगलीच वाढल्यामुळे केतकीने स्टेजवरुन उतरुन खाली जाण्यास नकार दिला. कारण आम्हाला त्या गर्दीतून संरक्षण देण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. शेवटी ज्या महिलांना केतकीच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले होते त्यांनी केतकीभोवती रिंगण करुन तिला त्या हजारोंच्या गर्दीतून गाडीपर्यंत सोडले. वास्तविक कुठल्याही महिला कलाकारांकरिता हा असा प्रसंग खूप त्रासदायक असतो. सुदैवाने एक वडील म्हणून मी तिथे होतो म्हणून हवी ती काळजी घेऊ शकलो. पण या प्रसंगानंतरही आयोजकांकडून दोन दिवस कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.’
हे सगळे मुद्दाम केले असे माझे अजिबात म्हणणे नाही. पण कलाकारांच्या सुरक्षेची गोष्ट विचारात घेतली गेली नाही असे मला वाटते. शिवाय एवढ्या दिवसांत बहिणाबाई महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून कोणतीच दिलगिरी व्यक्त करण्यात आली नाही म्हणून मी हा प्रसंग पुण्यातील शिवसेना चित्रपट सेनेला सांगितला. त्यांनी हे प्रकरण निलम गोऱ्हे यांना सांगितले. मग हे प्रकरण पुढे जात त्यांना याबद्दल लेखी माफी देण्यास सांगितले.