अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर विराट कोहलीने पोस्ट केला. ज्यानंतर देशभरात त्याविषयीच्याच चर्चांना उधाण आलं. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीला अुनष्का खडे बोल सुनावत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं होतं. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जिथे कचरा फेकणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या आईने विराट- अनुष्कावर आगपाखड केली तिथेच निर्माता दिग्दर्शक करण जोहरने त्यांना या प्रकरणात आपला पाठिंबा दिला आहे.

सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरलेल्या या मुद्द्यावर गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही आपली प्रतिक्रिया देत, अनुष्का- विराटला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच त्यांनी या सेलिब्रिटी जोडीची निंदा करणाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. विरुष्का हे सर्व प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तीने केला त्याविषयीच आपली प्रतिक्रिया देत रिजिजू यांनी ट्विट केलं, ‘काहीही… विराट आणि अनुष्काला प्रसिद्धीची काय गरज? त्यांना प्रसिद्धीपेक्षा या साऱ्यापासून दूर राहणं जास्त गरजेचं वाटत असेल. आपल्या वर्तनातूनच मानसिकतेचा सहज अंदाज लावता येतो.’ या ट्विटमधून त्यांनी स्वच्छतेचं महत्त्वं सांगितलं.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

स्वच्छतेचा महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून बराच अधोरेखित केला जात असून, प्रत्येकजण आपल्या परिने स्वच्छतेच्या या मोहिमेत आपलं योगदान देत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी आणि नेतेमंडळींपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी होताना दिसत आहे. दरम्यान, विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्काच्या रागाचा पारा चांगलाच चढल्याचं पाहायला मिळालं होतं. ती कारमधून प्रवास करत असताना समोरच्या कारमधून एका व्यक्तीकडून पाण्याची रिकामी बाटली बाहेर फेकण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करत तिने त्या व्यक्तीला रागे भरलं. सोबतच त्याला पुन्हा असं न करण्याची तंबीही दिली होती.

Story img Loader