हरयाणाची मानुषी छिल्लर आठवडाभरापूर्वी फारशी चर्चेतही नव्हती. पण, १८ नोव्हेंबर हा दिवस तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेला. चीनमधील सान्या येथे पार पडलेल्या मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धेत भारताच्या मानुषी छिल्लरने बाजी बारत मानाचा मुकूट जिंकला. तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीच्या वाट्याला हे यश आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय. मानुषीला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते प्रियांका चोप्रानेही शुभेच्छा दिल्या. मिस वर्ल्ड मानुषीविषयीच्या बऱ्याच गोष्टी सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तिच्या डाएट प्लॅनपासून ते अगदी वैद्यकिय शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियाची मदत घेतली आहे.

मानुषीविषयीची माहिती जाणून घेणाऱ्यांच्या मनात आणखी एका प्रश्नाने घर केले आहे. तो प्रश्न म्हणजे, ‘बक्षीस स्वरुपात तिला नेमके काय मिळणार?’. काही इंग्रजी वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मिस वर्ल्ड या किताबासोबतच मानुषीला इतरही बऱ्याच गोष्टी बक्षीस स्वरुपात मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. जवळपास शंभरहून जास्त देशांतील सौंदर्यवतींशी संवाद साधण्याच्या संधीसोबतच मानुषीला विविध देशांतील संस्कृतीविषयी जाणून घेण्याचीही संधी मिळणार आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही तिला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/Bbqjs25DRoH/

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

कोट्यवधींच्या घरात किंमत असलेल्या मानाच्या मुकुटासोबतच मानुषीला रोख स्वरुपातही बक्षीसपात्र रक्कम देण्यात येणार असल्याचे कळत आहे. या किताबासाठी तिला जवळपास १० कोटींची रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरीही या आकड्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. रोख रकमेशिवाय जवळपास वर्षभर कार्यक्रमांच्या निमित्ताने जगातील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी तिच्या प्रवास खर्चाचाही या बक्षिसात समावेश आहे. यामध्ये ती जगातील कोणत्याही ठिकाणाला भेट देऊ शकणार असून, या प्रवासासाठी तिला कोणताच खर्च करावा लागणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या ब्रॅण्ड्सची सौंदर्यप्रसाधने, डिझायनर ज्वेलरी, डिझायनर कपडे वापरण्याची संधीही तिला मिळणार आहे. या साऱ्यासाठी तिला स्वत:ला कोणताच खर्च करण्याची गरज नसल्याचे म्हटले जातेय. बक्षीस स्वरुपात या सर्व गोष्टी मिळणाऱ्या मानुषीला ख्यातनाम व्यक्ती आणि ब्रॅण्डसाठी काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे या सौंदर्यवतीसाठी खऱ्या अर्थाने उज्ज्वल भवितव्याची दालने खुली झाली आहेत, असे म्हणायला हरकत नाही.