एकीकडे अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान यांसारखे मोठमोठे बॉलिवूड कलाकार छोट्या पडद्यावर विविध शोजच्या माध्यमातून झळकत असतानाच सैफ अली खानचे यासंदर्भात विचार जरा वेगळेच आहेत. टेलिव्हिजनवरील मालिकांच्या किंवा कार्यक्रमांच्या निर्मात्यांची विचारसरणी छोटी असते, असं तो म्हणतो.
‘छोट्या पडद्यावरील मालिकांचं किंवा कार्यक्रमांचं बजेट खूप कमी असतं. माध्यम जितकं लहान असतं, विचारसरणीदेखील तितकीच लहान होते. कुत्र्याप्रमाणे ते राबवून घेतात. टेलिव्हिजन कलाकार आणि चित्रपटांतील कलाकार यांमध्ये खूप फरक आहे, कारण निर्मात्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून मला छोट्या पडद्यावर काम करायची इच्छा नाही,’ असं सैफ म्हणाला.
वाचा : ओमर अब्दुल्ला आणि अदनान सामी यांच्यात ‘ट्विटर- वॉर’
सैफने यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील पटकथालेखकांवरही टीका केली. बदलत्या काळानुसार, प्रेक्षकांच्या बदलत्या मागण्यांनुसार लेखनात आवश्यक ते बदल दिसत नाहीत, अशी खंतही त्याने व्यक्त केली. ‘नवीन कल्पना ऐकायला मिळत नाहीत हीच मूळ समस्या आहे. मी लेखकांना नाराज करू इच्छित नाही. मात्र, प्रेक्षक बदलतो आहे आणि काळानुसार त्यांच्या मागण्याही बदलत आहेत. मात्र चित्रपट कथालेखनात अपेक्षित बदल झालेले आढळत नाहीत,’ असं त्याने म्हटलं.
वाचा : जेव्हा शाहरुखला वैतागून गौरीने केला होता ब्रेकअप
सैफ अली खानचा ‘शेफ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याला थंड प्रतिसाद मिळत आहे.