गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्या अडकली आहे. काही दिवसांपूर्वी सीरिजमध्ये गोरखा सुमदायाने जातीवाचक शब्द वापरल्यामुळे अनुष्काला कायेदशीर नोटीस बजावली होती. आता गाझियाबादमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा फोटो एका गुन्हेगारासोबत वापरल्यामुळे सीरिजवर टीका केली होती. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे असे म्हटले होते. या वादावरुन भाजपा आमदाराने विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली आहे.
‘न्यूजरुम पोस्ट’ने या संदर्भात नंदकिशोर गुर्जर यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी, ‘देशापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्याने देशाचे नाव मोठे केले आहे. तो देशभक्त आहे. त्याने अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यायला हवा. अनुष्का विराटसोबत राहत आहे. तिने राष्ट्रदोहाचे काम केले आहे’ असे म्हणत विराटला सल्ला दिला आहे.
#Ghaziabad: BJP leader Nandkishor Gurjar (@nkgurjar4bjp) has filed a case against actor turned producer @AnushkaSharma. FIR is regarding Web Series #PataalLok. He accused actress of sedition and advised @imVkohli to divorce her. (Story in Development) pic.twitter.com/NNEXAFclfX
— Newsroom Post (@NewsroomPostCom) May 23, 2020
काही दिवसांपूर्वी नंदकिशोर गुर्जर यांनी एक पत्रक जारी केले होते. या पत्रकामध्ये अनुष्का शर्माने तिच्या वेब सीरिजमध्ये नंदकिशोर गुर्जर यांचा फोटो एका गुन्हेगारासोबत दाखवला होता. तसेच तो दाखवण्याआधी तिने त्यांची संमती घेतली नव्हती. या कृत्यातून तिने गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे. गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.
‘पाताल लोक’ ही वेब सीरिज १५ मे पासून अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. या थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी हे कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. NH10 आणि उड़ता पंजाबचे लेखक सुदीप शर्मा यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे.