कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत अभिनेते शदर पोंक्षे यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा देणे योग्य निर्णय असल्याचे म्हटले. दोषींनी पुढे सर्वोच्च न्यायलयात जाऊन दाद मागितली तरी त्यांची शिक्षा कमी होणार नाही, अशी आशाही त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना व्यक्त केली.

कोपर्डीतील घटना अतिशय घृणास्पद आणि चीड आणणारी होती. यापूर्वीही बलात्कारासारखे अक्षम्य गुन्हे करणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली गेली होती. त्यामुळे जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या दोषींना न्यायालयाने कोणतीही सहानुभूती दाखवू नये असे शरद पोंक्षे म्हणाले. तसेच या प्रकरणात कोणीही अल्पवयीन नसल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
‘दहशतवादाला जसा धर्म नसतो, तसेच बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांनाही कोणताही धर्म आणि जात नसते. जातीच्या आधारे कोणत्याच गुन्ह्याचे समर्थन करता येऊ शकत नाही. राक्षसांना कोणतीही जात नसते, ते बलात्कारी आहेत, त्यामुळे त्यांना फाशीही झालीच पाहिजे, असे पोंक्षे यांनी सांगितले. मुळात कोणत्याच गोष्टीत जात- धर्म आणता कामा नये असे माझे मत आहे. मात्र, अनेकांना मानवतेचे, जातीचे पुळके येतात. कुत्र्यांना मारू नका हा जरी नियम असला तरी पिसाळलेल्या कुत्र्यांना ठारच मारायचं असतं. त्याला सांभाळता येत नाही, असे  त्यांनी म्हटले आहे.

‘निर्भया प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते, त्या गोष्टीलाही माझा विरोध होता. ज्या मुलाला एखाद्या स्त्रीकडे पाहून त्याची वासना जागृत होते आणि त्याला असे निर्घृण कृत्य करावेसे वाटते, तेव्हा तो अल्पवयीन  कसा असू शकतो? मुळात कायद्यात काही आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. बॉम्बस्फोट, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांचे निकाल कमीत कमी वेळेत लावणे अत्यावश्यक आहे. आपल्याकडे न्यायलयीन प्रक्रियेला एवढा वेळ लावला जातो की, त्यादरम्यान जनतेच्या भावना बोथट होऊन जातात. पीडितांच्या कुटुंबीयांचे किंवा जनतेचे अश्रू सुकायच्या आत निकाल लागणं फार आवश्यक आहे. तरच भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल,’ असे  मत त्यांनी व्यक्त केले.