बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. आता शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. दरम्यान अभिनेता कमाल आर खानने ट्विटरवर चित्रपटाची कथा लिक केली आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने ट्वीट करत शाहरुखचा आगामी चित्रपट ‘पठाण’ची स्क्रीप्ट लिक केली आहे.

>>२५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात, पाहा फोटो

त्याने दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये “शाहरुखने गेल्या ३-४ वर्षांमध्ये एकही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे आता तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी अतिशय चांगली कथा निवडेल असे मला वाटले होते. पण ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे, जॉन अब्राहम रशियन माफिया आणि दीपिका पदूकोण महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे… शाहरुखला वाटतय हा चित्रपट हिट होणार? खरच तुला असं वाटतं का?” असे म्हटले आहे.

पुढे त्याने ‘शाहरुखने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे कारण सिद्धार्थ आनंद यांचा वॉर हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटात कथा अशी काही नव्हती. शाहरुखला एक गोष्ट समजायला हवी की प्रेक्षक वॉर चित्रपटाची कथा पाहण्यासाठी गेले नव्हते. ते हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसारख्या तरुण कलाकारांना पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये गेले होते’ असे म्हटले आहे. सध्या केआरकेचे ट्वीट हे चर्चेचा विषय ठरले आहेत.

पाहा : शाहरुखच्या ‘मन्नत’पेक्षाही कमी नाही केआरकेचा ‘करोना फ्री बंगला’

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे ब्रेक नंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.