पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला.
लतादीदींचं ट्विट-
नमस्कार. अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण आडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे. आज भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम जन्मभूमी न्यास अध्यक्ष नृत्य गोपाल दासजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या भूमिपूजनाला उपस्थित राहतील. आज करोनामुळे लाखो रामभक्त तिथे पोहोचू शकले नसले तरी त्यांचं मन श्रीराम यांच्या चरणी लीन असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचा मला खूप आनंद आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण विश्व खूप खूश आहे. जणू प्रत्येक श्वास आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून जय श्री राम हा उच्चार होत आहे.
नमस्कार.कई राजाओं का ,कई पीढ़ियों का और समस्त विश्वके राम भक्तोंका सदियों से अधूरा सपना आज साकार होता दिख (cont) https://t.co/9vYy3nRylh
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 5, 2020
मंदिराचे प्रारूप
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.