टेनिसपटू लिअँडर पेस आणि त्याची पत्नी रिया पिल्लई यांच्यामध्ये सुरू असलेल्या घरगुती हिंसेचा वाद दरदिवशी नवे वळण घेत आहे. रियाने काही दिवसांपूर्वी मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे दार ठोठावले होते. पेसच्या वकिलाने तिच्यावर अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची तक्रार तिने राष्ट्रीय महिला आयोगाला एक पत्र लिहून केली. रियाने या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीदरम्यान एक निरीक्षक नेमला जावा, अशी मागणी केली.
रियाने सांगितले की, ‘अनेकदा उलट तपासणीदरम्यान पेसच्या वकिलाने न्यायालयात आणि प्रसारमाध्यमांसमोर मला आक्षेपार्ह प्रश्न विचारले. तुझ्यासारख्या महिलेला काय बोलतात हे मला माहीत नाही असे शब्दही त्याने वापरले. कधी तो मला रिया पिल्लई असे संपूर्ण नाव घेऊन हाक मारतो तर कधी तुला कोणत्या आडनावाने बोलावू हा प्रश्न विचारतो. अनेकदा त्याने माझी खिल्लीही उडवली. मी त्याला काही प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर देण्याआधीच तो माझ्यावर चिडतो.’
या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत रियाने प्रत्येक सुनावणीला एक निरीक्षक नेमला जावा, अशी मागणी केली. यापुढील सुनावणीत तिच्याबद्दल आक्षेपार्ह बोलले जाऊ नये तसेच एक महिला म्हणून तिचा योग्य मान ठेवला जावा यासाठी तिने ही मागणी केली आहे. पुढचे सहा महिने तरी हे प्रकरण सुरू राहील असे रियाला वाटते.
रियाने पत्रात म्हटले की, ‘मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे एका निरीक्षकाची मागणी करत आहे. मी न्यायालयाला पूर्ण सहकार्य करतेय. तसेच प्रत्येक सुनावणीला मी न्यायालयात हजर असते आणि आतापर्यंत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे मी त्यांना सुपूर्त केली आहेत. पण वकील अबद पोंडा यांनी माझ्याशी गैरव्यवहार केलाय. त्यांनी माझ्यावर आक्षेपार्ह टिपणी केली. मी हे सगळे ऐकून घ्यायला आणि सहन करायला न्यायालयात जात नसून माझ्या सुरक्षेसाठी मी तिथे जाते.’
रियाच्या या वक्तव्यावर पोंडा यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व काही नोंद होत असते. रियाने लावलेल्या आरोपांपैकी एकही वाक्य किंवा शब्द मी बोललेलो नाही. अखेर सत्य लोकांसमोर येत असल्याचे ती सहन करु शकत नाहीये. तिच्यासोबत मी नेहमीच अदबीने बोलतो, असे ते म्हणाले.
अभिनेता संजय दत्तसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मॉडेल रिया पिल्लई २००५ पासून लिअँडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघे आठ वर्षे लिव्ह- इनमध्ये होते. या दोघांना एक मुलगीही आहे. पण २०१३ मध्ये दोघांमध्ये भांडण झाले आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले. २०१४ मध्ये रियाने लिअँडर आणि त्याच्या वडिलांवर घरगुती हिंसाचाराविरोधात तक्रार केली होती.
या प्रकरणात जेव्हा त्यांना एकत्र बसून भांडण मिटवण्यास सांगण्यात आले तेव्हा पेसने न्यायालयात रियासोबत त्याचे कधीच लग्न झाले नसल्याचे सांगितले. रिया आणि पेस वेगळे झाल्यानंतर रियाने त्याच्याकडे ४ लाख रुपये प्रती महिन्या पोटगी देण्याची मागणी केली होती. यावरही पेसने लग्न न झाल्यामुळे कोणतीही पोटगी देणार नसल्याचे सांगितले. तेव्हापासून या प्रकरणात दोघंही न्यायालयाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत.