सध्याच्या घडीला तरुणाईच्या आवडत्या अभिनेत्रींची नावं विचारल्यावर दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांचीच नावं पुढे येतात. आवडत्या अभिनेत्रींची यादी किंवा मग या यादीचा कालखंड थोडा मागे नेला तर माधुरी दीक्षित हे नाव पुढे येतं. त्यासोबतच आणखी एका नावाला प्रेक्षकांची निर्विवाद पसंती मिळाली आणि आजही मिळते, ते नाव म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांचं. खरंतर श्रीदेवी यांच्याविषयी कितीही आदर असला तरीही आदरार्थी बोलण्यापेक्षा अगंतुगंच्या भाषेतच बोलताना आपलेपणाची भावना येते. त्यामुळे इथे हे स्वातंत्र्य घेण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटतं. कलाविश्वात ती आता ज्या टप्प्यावर होती ते पाहता ज्येष्ठ अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा उल्लेख करण्यास काहीच हरकत नाही. कारण मंडळी तीनशे चित्रपट करणारी ही सौंदर्यवती म्हणजे एक करिष्माच जणू. वयाच्या सीमांनी कधीही तिच्या सौंदर्यावर आणि सुरेख हसण्यावर आपली बंधनं लादली नाहीत आणि लादतीलही कसं?, तिच्या नुसत्या स्मितहास्याने चंद्र, तारे आणि सर्व वातावरणच कसं प्रफुल्लित व्हायचं. इथे सर्व वाक्य भुतकाळात लिहिण्याचं कारण की, सौंदर्याचं अफलातून समीकरण असणाऱ्या या अभिनेत्रीने आज आपल्याला अलविदा केलं आहे. काल परवा ज्या अभिनेत्रीच्या स्टाईल स्टेटमेंटच्या चर्चा होत होत्या, त्याच अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने आजचा दिवस उजाडला. श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. धक्काच आहे हा… दैवही कसं असतं ना, कुटुंबियांना प्राधान्य देणाऱ्या, कुटुंबासाठी म्हणून आपल्या कारकिर्दीला दूर लोटणाऱ्या या अभिनेत्रीने शेवटचा श्वासही तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीतच घेतला.
श्रीदेवी. नाव ऐकलं की ती दाक्षिणात्य अभिनेत्री आहे याचा अंदाज आपल्याला येतो. पण, सहा भाषांवर प्रभुत्त्व असणारी ही अप्सरा अभिनयाच्या बाबतीतही उजवी ठरली. मीसुद्धा तिच्याविषयी पहिल्यांदाच ऐकलं किंबहुना त्यांना पहिल्यांदा तेव्हा हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे असंच मला वाटलं. कारण पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी मी तिचा जो चित्रपट पाहिला तोसुद्धा वेगळाच होता. तो चित्रपट होता ‘मिस्टर इंडिया’. चार्ली चॅपलिनच्या रुपात तिचं येणं असो किंवा मग संपादकांशी भांडणं असो मला ती तेव्हापासूनच प्रचंड आवडू लागली. ‘हवा हवाई…’ असं घोळक्याने म्हटल्यावर वुईवुईवुईवुई….. करत येणाऱ्या श्रीदेवीचा तो अंदाज माझ्या मनात असा काही घर करुन गेला की, ते वुईवुईवुईवुई म्हणणं आपल्यालाही जमावं यासाठी मी चक्क सराव करु लागले होते. काळ पुढे गेला ‘मिस्टर इंडिया’पासून माझ्या मनात घर केलेली ही अभिनेत्री इतकी सुंदर कशी, तिचा आवाज किती छान आहे, ती कशी बोलते ना या साऱ्याचं मला तेव्हा अप्रूप वाटायचं. ‘मिस्टर इंडिया’शी प्रेम करणाऱ्या या अभिनेत्रीचं ‘करते है हम प्यार मिस्टर इंडिया से…’ हे गाणं मला आजही आवडतं. नव्वदच्या दशकापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या श्रीने साधेपणाही तितक्याच सुरेखपणे जपला. विविध कार्यक्रमांना तिची उपस्थिती तशी कमीच असायची. पण, ‘आप आए बहार आयी…’ वगैरे म्हणतात ना ते तिच्या येण्यावर आपसूकच अनेकांच्या तोंडून निघायचं.
https://www.instagram.com/p/BdLfuUghYZe/
BLOG : सिनेसृष्टीतली ‘चाँदनी’ निखळली
काही वर्षांपूर्वी तिचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट मला पुन्हा मला तिच्या प्रेमात पाडून गेला. तिने साकारलेल्या ‘शशी’ला पाहू प्रत्येकाला त्यांची आई तर आठवली. पण, प्रत्येक महिलेला ज्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसते आणि तिच्याकडे जणू काही एखाद्या आरोप्याच्या नजरेतून पाहिलं जातं तेव्हा नेमकं कसं वाटत असेल याचंच उदाहरण तिने साकारलेल्या शशीच्या रुपात पाहायला मिळालं. ‘मिस्टर इंडिया’ ते ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि गेल्या वर्षीच प्रदर्शित झालेला ‘मॉम’ हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘मै ख्वाबों की शहजादी म्हणत’ दिमाखात येणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्यातून एक्झिट घेतली आहे यावर विश्वासच बसत नाही. मुळात सौंदर्य आणि साधेपणाची खाण असणारी ही अभिनेत्री अशी कशी निघून जाऊ शकते, हाच प्रश्न माझ्यासारख्या असंख्य प्रेक्षकांच्या मनात काहूर माजवत आहे. पण, सत्य हेच आहे की श्रीदेवीची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. सौंदर्य आणि कलेच्या या अनोख्या श्रीदेवीला माझ्यासारख्या लाखो, करोडो चाहत्यांची भावपूर्ण श्रद्धांजली….