मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ हा चित्रपट पदार्पणापूर्वीच बराच चर्चेत आलाय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित या चित्रपटाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. इंदौर शहर काँग्रेस समितीकडून याचा विरोध सुरू असून प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागणार असेच चित्र दिसतेय. समितीचे महामंत्री विवेक खंडेलवाल आणि गिरीष जोशी यांनी सिने सर्किट असोसिएशन आणि सिनेगृह संचालकांना पत्र लिहिले. इंदौरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली.

चित्रपटातील व्यक्तिरेखा या इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यावर आधारित असून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी तक्रार या पत्रातून करण्यात आली. कथा जरी काल्पनिक असली तरी चित्रपटातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली. इतकेच नाही तर सरकार या चित्रपटाद्वारे राजकीय प्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोपदेखील त्यांनी या पत्रातून केलाय.

indu-sarkar

दुसऱ्या बाजूला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना चित्रपटात राजकीय हस्तक्षेप चुकीचा वाटतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राशी बोलताना मधुर भांडारकर म्हणाले की, ‘काय बोलावे हेच नेमके मला समजत नाहीये. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही यामध्ये हस्तक्षेप करण्यास सांगितले. काल लखनऊमध्ये माझा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आणि अलाहाबादमध्येही अशाच काही घटना घडल्या. हे खूप चुकीचे आहे. त्यांनी अद्याप चित्रपट पाहिलासुद्धा नाही.’

Mom Movie Collection: श्रीदेवीची घोडदौड सुरूच

देशातील आणीबाणीच्या परिस्थितीवर आधारित जरी चित्रपट असला तरी कथा ही काल्पनिक आहे, केवळ ठराविक सत्यघटना त्यात दर्शवण्यात आल्याचे मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केले. २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून किर्ती कुल्हारी, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत.