‘इंदू सरकार’प्रकरणी अखेर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दिलासा मिळालाय. सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला असून, चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यात आलंय. या निर्णयानंतर सेन्सॉरचे आभार मानत मधुर भांडारकर यांनी ट्विट केले. ‘सीबीएफसीच्या समितीचे खूप आभार. काही कट सांगितल्यानंतर इंदू सरकार चित्रपटाला प्रदर्शनाची मंजुरी मिळाली. या निर्णयाने मी आनंदी आहे. येत्या शुक्रवारी, २८ जुलै रोजी हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.
सीबीएफसीने १२ कट सांगत चित्रपटाला मंजुरी दिली. आरएसएस, अकाली दल यांसारख्या शब्दांना चित्रपटातून हटवण्यात आले. चित्रपटाला सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचा विरोध होता. चित्रपटातून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भांडारकर करत आहेत, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता. इंदौर, अलाहाबादमध्ये मधुर भांडारकर यांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळण्यात आले होते.
Thank you CBFC Revising Committee.#InduSarkar has been cleared with few cuts.Happy & relieved..see you in cinemas this Friday, 28th July. pic.twitter.com/NVtRsnsprS
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 24, 2017
इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चित्रपटातील नेमक्या कोणत्या घटना काल्पनिक आणि वास्तव आहेत याचे स्पष्टीकरण भांडारकर यांनी द्यावे, अशी मागणी पॉल यांनी याचिकेद्वारे केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. या सर्व विरोधानंतर अखेर ‘इंदू सरकार’ प्रदर्शनासाठी सज्ज झालाय.
वाचा : ‘चांगले रक्त कधीच वाईट बोलू शकत नाही’
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळातील राजकीय घडामोडींवर आधारित हा चित्रपट आहे. ‘इंदू सरकार’मध्ये नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, सुप्रिया विनोद आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत.