माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. चित्रपटाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा विरोध असून दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शनेही करण्यात आली. मात्र मधुर भांडारकर यांनी हे स्पष्ट केले की ‘इंदू सरकार’मधील कोणतेही दृष्य हटवणार नाही आणि कोणालाही प्रदर्शनापूर्वी दाखवणार नाही.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही शब्दांवर आक्षेप घेतला असून त्यांना हटवण्यास सांगितले होते. ‘टाईम्स नाउ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मधुर यांनी स्पष्ट केले की, ‘मी माझ्या चित्रपटातील कोणताच शब्द हटवणार नाही. सेन्सॉर बोर्डाची यादी मिळताच मी याबाबत माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करेन आणि त्यानंतर ट्रिब्युनल किंवा रिवायझिंग समितीकडे जाईन. सेन्सॉर बोर्डाचा निर्णय मला मान्य नाही. त्यांनी जे शब्द हटवण्यास सांगितले ते मला मान्य नाही. त्या शब्दांना हटवण्याची काही गरज नाही कारण तसे केल्यास चित्रपटाचा मूळ उद्देश हरवेल.’

PHOTO : स्मृती इराणीच्या मुलीचा हा फोटो पाहिलात का?

आरएसएस, कम्युनिस्ट यांसारखे शब्द हटवण्यावर मधुर भांडारकर यांचा आक्षेप आहे. हे शब्द सर्वसामान्यपणे वापरले जातात असे त्यांचे मत आहे. यासंदर्भात ते पुढे म्हणाले की, ‘या शब्दांचा आपण रोज उल्लेख करतो आणि चित्रपटात कोणताही अपशब्द वापरला गेला नाहीये. या चित्रपटासाठी मी खूप संशोधन केले आहे तर मग मी त्या शब्दांना का वापरू शकत नाही?’

वाचा : …म्हणून रेहमानच्या कॉन्सर्टमधून निघून गेले चाहते

दुसऱ्या बाजूस चित्रपटाचा विरोध करणारे मुंबई काँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट पाठवण्याआधी त्यांना चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर भांडारकर म्हणाले की, ‘माझ्यावर सर्व बाजूंनी हल्ला केला जातोय. कोणी हा चित्रपट पाहण्याची मागणी करत आहेत तर एक राजकीय पक्ष चित्रपटाच्या २-३ मिनिटांच्या ट्रेलरमागे हात धुवून लागली आहे. त्यांनी आधी हा संपूर्ण चित्रपट बघावा आणि मग निर्णय घ्यावा असे मला वाटते.’