चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या मराठी पदार्पणातला चित्रपट ‘बकेट लिस्ट’. माधुरीच्या पदार्पणातला हा चित्रपट असल्याने या चित्रपटाभोवती एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. प्रेक्षकांचं हेच प्रेम बॉक्स ऑफिसवर प्रकर्षाने जाणवलं. प्रेक्षकांवर आपली जादू केल्यानंतर आता माधुरीची ही बकेट लिस्ट चित्रपट महोत्सवांमध्ये आपलं नाणं वाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात जगण्याची नवी उमेद देणारा हा चित्रपट दाखवला जाणार आहे. २००८ साली सुरूवात झालेल्या या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाने दहा वर्ष पूर्ण केली आहेत. मानाचा समजला जाणाऱ्या या चित्रपट महोत्सवात चांगल्या कलाकृतींचा सन्मान नेहमीच केला गेला आहे. हीच परंपरा पुढे नेत यंदाही अशा विविध कलाकृतींचं सादरीकरण या चित्रपट महोत्सवात केलं जाणार आहे. ज्यात तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित बकेट लिस्ट या चित्रपटाचा समावेश आहे.
वाचा : प्रदर्शनापूर्वीच रजनीकांत यांच्या ‘काला’ने जमवला २०० कोटींचा गल्ला
करण जोहर आणि ए. ए. फिल्म्स प्रस्तुत आणि डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स, ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे. तर सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केलं आहे. २५ मे ला प्रदर्शित झालेल्या माधुरीच्या या बकेट लिस्ट ने आतापर्यंत ६ कोटी ९५ लाख रुपयांचा गल्ला जमवलेला आहे आणि सिनेमाची घोडदौड अजूनही यशस्वीरित्या चालली असून चित्रपटाची मोहिनी प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे.