मराठी सिनेसृष्टीकडे सध्या साऱ्यांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत. वेगवेगळे विषय आणि ते विषय हाताळण्याची अनोखी पद्धत यामुळे हिंदी सिनेसृष्टीही मराठी सिनेमांकडे गांभीर्याने पाहू लागली आहे. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, जॉन अब्राहम असे अनेक हिंदी कलाकार मराठीत आवर्जुन काम करताना दिसतात. आता या सगळ्या हिंदी कलाकारांमध्ये हिंदीतील आणखी एक हुकमी एक्का मराठीत येण्यास सज्ज झाला आहे. हा हुकमी एक्का म्हणजे ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित- नेने.

माधुरी लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे. ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’ या बॅनरअंतर्गत माधुरी सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाचे नाव अजून ठरले नसून त्यात कोणते कलाकार काम करणार आणि तंत्रज्ञांची निवड यावर सध्या काम सुरू आहे. या वर्षअखेरीस या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरूवात करण्याचा टीमचा मानस आहे. तसेच नितीन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असतील. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

एकीकडे परदेशात माधुरीवर मालिका करत असताना, दुसरीकडे ती आता स्वतः मराठीत येण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे सिनेमाची कथा नेमकी काय असेल, त्यात कोणते कलाकार काम करतील असे अनेक प्रश्न आता तिच्या चाहत्यांना सतावू लागले आहेत. आता माधुरी सिनेमाची निर्मिती करणात म्हटल्यावर तिचीही या सिनेमात एखादी भूमिका असेल की नाही याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये आता उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Story img Loader