मराठी सिनेसृष्टीकडे सध्या सर्वांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत. चित्रपटांचे नवनवीन विषय आणि ते विषय हाताळण्याची अनोखी पद्धत, दमदार पटकथा यांमुळे हिंदी सिनेसृष्टीही मराठी चित्रपटांकडे गांभीर्याने पाहू लागली आहे. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, जॉन अब्राहम असे अनेक हिंदी कलाकार मराठीत आवर्जुन काम करताना दिसतात. आता यामध्ये आणखी एक हुकमी एक्का मराठीत येण्यास सज्ज झाला आहे. हा हुकमी एक्का म्हणजे ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित-नेने.

माधुरीला मराठी चित्रपटात कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या चाहत्यांमध्ये लागली आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. माधुरी एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलं नलं तरी पटकथा हटके असल्याचं म्हटलं जातंय. आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका स्त्रीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

वाचा : सूरज पांचोलीसोबत काय करतेय धोनीची ऑनस्क्रीन पत्नी?

मराठी चित्रपटात काम करण्यासाठी माधुरी प्रचंड उत्सुक आहे. ‘या चित्रपटाची कथा तु्म्हाला प्रेरणा देणारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या खूप वेगळे आणि चांगले विषय पाहायला मिळत आहेत. आयुष्य खऱ्या अर्थाने कसे जगायचे हे हा चित्रपट प्रेक्षकांना शिकवणार आहे. मराठी चित्रपट करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी गेल्या काही वर्षांत अनेक पटकथा देखील वाचल्या आहेत. पण कोणतीच पटकथा मला तितकीशा भावत नव्हती. पण ही पटकथा वाचल्यावर काहीच क्षणात मला हा चित्रपट करायचाच आहे हा निर्णय मी घेतला,’ असं ती म्हणाली.