वर्षभर अभ्यास केल्यानंतर निकालाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रकारची भीती, उत्सुकता अशा संमिश्र भावना पाहायला मिळतात. अशाच भावनांचा काहूर माजलेल्या वातावरणातच यंदाचा दहावीचा निकाल लागला. काही विद्यार्थ्यांनी या निकालांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं तर काहीजणांचा हिरमोड झाला. पण, या आनंदाच्या एकंदर वातावरणामध्ये कलाविश्वातूनही मार्कांची टक्केवारी चर्चेत येऊ लागली.

‘दशक्रिया’ या राष्ट्रीय पुस्कार विजेत्या चित्रपटातील अभिनेत्री अनुश्री फडणीसच्या बहिणीलाही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं आहे. अनुश्रीची आतेबहिण मनाली शैलेश प्रधान हिला ९९ टक्के गुण मिळाले आहेत. ५०० गुणांपैकी ४९५ गुण मिळवत मनालीने हे यश संपादन केलं आहे. सध्या तिच्या या यशाबद्दल कुटुंबिय आणि मित्रपरिवारातही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पाहा : आर्चीच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल

manali-1

ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूल या शाळेत शिकलेली मनाली एक चांगली चित्रकारही आहे. तिने इंटमिडिएटची परीक्षाही दिली आहे. त्यामुळे अभ्यासासोबतच ती विविध शालेय उपक्रमांमध्येही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. मनालीच्या या यशाविषयी तिच्याशी संवाद साधला असता तिच्या बोलण्यातूनही आनंद व्यक्त होत होता. कुटुंबियांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा आणि आजचा दिवस तिच्यासाठीही खूपच खास असल्याचं तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. दहावीच्या नंतर सर्वांनाच विचारण्यात येणारा एक प्रश्न मनालीलाही विचारण्यात आला. त्यावर भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचा मानस असल्याचं तिने सांगितलं. मनालीच्या या यशाबद्दल अनुश्रीनेही तिचं अभिनंदन केलं आहे.

manali