महेश बाबू हे नाव फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य भाषा समजत नसतानाही फक्त अभिनयासाठी या सुपरस्टारचे चित्रपट अनेकजण पाहतात. अशा या महाराष्ट्राच्या जावयाचा आज वाढदिवस. महेश बाबू हे नाव आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा हा अभिनेता एका मराठी मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्नाची गाठही बांधली. अभिनेत्री नम्रता शिरोडकर या मराठमोठ्या अभिनेत्रीशी महेश बाबूने लग्न केलं.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा महेश बाबू पहिल्याच भेटीमध्ये नम्रताचा प्रेमात पडल्याचं त्याने एका कार्यक्रमात सांगितलं होतं. नम्रता महेश बाबूपेक्षा तीन वर्षांनी मोठी असून तिच्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटापासून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
१९९३ च्या ‘मिस इंडिया फेमिना’चा किताब जिंकल्यानंतर नम्रताने ‘जब प्यार किसी से होता है’ हा बॉलिवूड चित्रपट केला. या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर नम्रताने दाक्षिणात्य चित्रपट ‘वामसी’ साईन केला होता. या चित्रपटामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच दिवशी तो नम्रताच्या प्रेमात पडला. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्याने नम्रतासमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण पुढे पुढे सरकत असताना त्यांचं प्रेम बहरु लागलं होतं, असं महेश बाबूने सांगितलं.
महेश बाबू नम्रताला डेट करत असल्याची गोष्ट फक्त महेशच्या बहिणीला माहित होती. तिच्या व्यतिरिक्त घरातील अन्य कोणत्याही सदस्याला या नात्याविषयी माहित नव्हतं. विशेष म्हणजे ही गोष्ट प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठीच त्याने घरातल्यांनादेखील सांगितलं नव्हतं. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला.
महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत. गेल्या वर्षी महेश बाबूच्या ‘भारत अने नेनु’ हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांची कमाई केल्याचं पाहायला मिळालं.