‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘विठूमाऊली’ येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता ही मालिका पाहता येणार आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाची माऊली कशी झाली, या अवतारामुळे लोकोद्धार कसा झाला हेही पाहता येणार आहे.
‘विठूमाऊली’ या मालिकेच्या रुपानं विठ्ठलाची कथा रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर येणार आहे. मालिकेसाठी खास कपडे आणि दागिने डिझाइन करून घेण्यात आले आहेत. उच्च दर्जाच्या ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स’ची जोडही या मालिकेला मिळाली असल्यानं यातील भव्यता प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’नं मालिकेची निर्मिती केली आहे. या दोघांनीही पंढरपूरच्या मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं.
भव्य दिव्य विठ्ठल पर्वात स्वागत करूया "विठू माऊली"चं !#30thOctober #7pm #StarPravah #VithuMauli@swwapniljoshi @Gseamsak @ShrabaniDeodhar pic.twitter.com/kcBgX5qn2u
— Star Pravah (@StarPravah) October 24, 2017
या मालिकेतून अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. विठ्ठलाच्या भूमिकेत अजिंक्य राऊत, रुक्मिणीच्या भूमिकेत एकता लबडे, सत्यभामाच्या भूमिकेत बागेश्री निंबाळकर आणि राधाच्या भूमिकेत पूजा कातुर्डे हे कलाकार दिसणार आहेत. त्याशिवाय इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनुभवी कलाकारही आहेत.
वाचा : कोट्यवधींचा गल्ला जमवणाऱ्या ‘गोलमाल अगेन’साठी अजयने मानधन घेतलेच नाही, पण…
मालिकेविषयी निर्माते महेश कोठारे म्हणाले की, ‘विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील माणूस विठ्ठलाचा भक्त आहे. त्यात गरीब-श्रीमंत असा भेद नाही. प्रत्येकाच्या विठ्ठलाशी भावना जोडलेल्या आहे. मात्र, अनेकांना विठ्ठलाची गोष्ट माहीत नाही. ती मालिकेतून आम्ही दाखवणार आहोत. या मालिकेतून विठ्ठलाची कथा, त्याचे पौराणिक संदर्भ जपून, रंजक पद्धतीनं आणि तितक्याच भव्यतेनं सादर केली जाणार आहे. आमच्या टीमनं त्यासाठी पंढरपूरला जाऊन अभ्यास केला आहे, अनेक पोथ्या-पुराणांतून संदर्भ घेतले आहेत. विठ्ठल मंदिराचे विश्वस्त, जाणकार-तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे. ही मालिका महाराष्ट्र नक्कीच डोक्यावर घेईल, विठूमाऊलीसमोर नतमस्तक होईल याची मला खात्री आहे.’