प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीच्या मामेभाऊ, वहिनी आणि मामीचा कार अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी मेरठ-हापूड मार्गावर हा अपघात झाला. महिमाचा मामा अशोक कुमार हे त्यांचा मुलगा सूर्यप्रताप, सून आंचल आणि पत्नीसह मेरठ येथील एका रुग्णालयात जात होते. सूर्यप्रताप त्यावेळी कार चालवत होते. मेरठ-हापूड मार्गावरील लोहिया फार्महाऊसजवळ समोरून येणाऱ्या बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. सूर्यप्रताप यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अशोक कुमार, आंचल आणि महिमाच्या मामीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आंचल आणि महिमाच्या मामीचा मृत्यू झाला. महिमाचे मामा अशोक कुमार यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खारकोडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : ‘ट्युबलाइट’च्या कमाईने झू झू नाखूष

मामेभाऊ आणि वहिनीच्या अंत्यसंस्कारासाठी महिमा चौधरी हापूडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिमा चौधरी बऱ्याच कालावधीपासून माध्यमांपासून दूर होती. फारशी पार्ट्यांमध्ये न दिसणारी महिमा या अपघाताच्या घटनेनंतर एका कार्यक्रमाला हजर राहिली होती. या कार्यक्रमातील तिचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.