दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’ला राजपूत संघटनांचा विरोध होत आहे. करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना उघडपणे धमकीही दिली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

‘पद्मावती’ची घोषणा झाल्यापासूनच विविध कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाच्या कथानकावर करणी सेनेचा आक्षेप आहे. राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण भन्साळी यांनी असे कोणतेही दृष्य चित्रीत न केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जयपूर येथे या चित्रपटाच्या सेटवर करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रिकरणादरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शनानंतर हा विरोध तीव्र झाला. ‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, अशी धमकीच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी दीपिकाला दिली होती. या पार्श्वभूमीवर दीपिका, संजय लीला भन्साळी आणि रणवीर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

दुसरीकडे चित्रपट प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केले. ‘कागदपत्रांमध्ये तो काल्पनिक चित्रपट आहे की ऐतिहासिक हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे जाणून घेण्यासाठी सेन्सॉरने भन्साळींकडे विचारणार केली आहे. पण, उलटपक्षी सेन्सॉरवरच चित्रपट प्रमाणित करण्यात दिरंगाई केली जात असल्याचे आरोप लावले जात आहेत,’ असेही ते म्हणाले. सेन्सॉरची नाराजी आणि राजपूत संघटनांचा विरोध पाहता अखेर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये दीपिका राणी पद्मिनी, शाहिद कपूर महारावल रतन सिंह तर रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.