एखाद्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दोन वर्षीय मुलगी असल्याचं तुम्ही कधी पाहिलंत का? आगामी ‘पीहू’ या चित्रपटात दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. विनोद काप्री दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून, कलाकार मंडळींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव लवकरच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारणसुद्धा दोन वर्षांची ‘पीहू’ अर्थात मायरा आहे.

संपूर्ण चित्रपट एकाच कलाकारावर आधारित असून दोन वर्षांच्या चिमुकलीनं मुख्य भूमिका साकारणारा हा पहिलाच चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘पीहू’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी विचारणा केली आहे. आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांची मुलगी एकटी घरात काय काय करू शकेल आणि कोणत्या परिस्थितीतून जाईल हे जिथं विचार करणंसुद्धा अवघड आहे. दोन वर्षांची चिमुकली पीहू अशाच परिस्थितीतून जात असल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांकडून दोन वर्षांच्या मायरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वाचा : ‘त्या’ चित्रपटात दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडने साकारावी सलमानची भूमिका- रणवीर

जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एक छोटीशी मुलगी घरात एकटी असताना काय काय करते हे दाखवण्यात आलं आहे. अकस्मात तिच्या आईचा मृत्यू आणि त्यानंतरचा छोट्या पीहूचा प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तिचं फ्रीजमध्ये जाऊन बसणं, गॅस पेटवणं, मायक्रोवेव्ह ऑन करणं आणि त्यातच बेडवर निपचित पडलेल्या आईला सतत आवाज देणं पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. दोन वर्षांच्या मायराच्या अभिनयाने मोठमोठे कलाकार आणि नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे.