ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित असल्यामुळे तो ऐतिहासिक काळ दाखविण्यासाठी मोठमोठे ४२ सेट उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सेट उभारण्यासाठी पुस्तकांचा आधार घेण्यात आला आहे.

जवळपास २०० कोटींच्या आसपास बजेट असलेल्या या चित्रपटासाठी प्रत्येक गोष्टींवर अमाप खर्च करण्यात आला आहे. अगदी चित्रपटातील कलाकारांच्या कॉच्युमपासून ते सेट उभारण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. त्यातच चित्रपटातील कथानक प्रत्यक्षात उतरविण्यासाठी चित्रपटाच्या मेकर्सने काही ऐतिहासिक पुस्तकांचा आधार घेतला. मेकर्सने ऐतिहासिक पुस्तकांमधील माहितीच्या आधारे या चित्रपटातील ४२ सेट उभे केले आहेत. हे सगळे सेट वेगवेगळे असून त्यामधून ऐतिहासिक काळ जागविण्यात आला आहे.

वाचा :  Photo : ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’मधील कलाकारांचे फर्स्ट लूक

 दरम्यान, हा चित्रपट कुरनूल येथे राहणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असून चिरंजीवी यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये चिरंजीवीसोबत अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, तमन्ना भाटिया हे कलाकार पाहायला मिळत आहेत.