‘पद्मावती’ या चित्रपटाच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कारण, मध्य प्रदेश आणि पंजाब मागोमाग आता पश्चिम बंगालचे मंत्री साधन पांडे यांनीही ‘पद्मावती’चा विरोध केला आहे. ‘चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कोणत्याही प्रसंगाचा संदर्भ इतिहासात नमूद केलेला नाही. त्यामुळे इथे सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचे लक्षात येत असून, चित्रपट फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या हेतूनेच साकारण्यात आला आहे’, असे म्हणत त्यांनी चित्रपटाचा विरोध केला.

राजपूत करणी सेना आणि जय राजपूताना संघ या संघटनांनी चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. त्यानंतरच्या काळात बऱ्याच राजकीय नेते मंडळींनीही चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली. मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांसोबतच दक्षिण भारतातूनही चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चित्रपटाचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले होते. पण, आता मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील साधन पांडे यांनी चित्रपटाचा विरोध केल्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच होणारा विरोध पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचाही निर्णय घेतला. या चित्रपटाचा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंतही पोहोचला होता. राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेली दृश्ये या चित्रपटातून वगळण्यात यावीत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने मात्र नकार दिला. मुळात चित्रपटाला अद्यापही सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली नसल्यामुळे सुप्रीम कोर्ट कोणताही निर्णय देऊन सेन्सॉर बोर्डाची उपेक्षा करु इच्छित नाही, असा निर्णय देण्यात आला.