नुकत्याच झालेल्या ‘मामी’ चित्रपट महोत्सवात जिथे कंगना रणौत, हुमा कुरेशी, डायना पेंटी आणि कल्कि कोचलिन यांच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा होत असताना दुसरीकडे श्रीदेवीच्या कपड्यांबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. श्रीदेवीने नक्की काय विचार करून हा ड्रेस घातला, असा प्रश्नही अनेकांकडून विचारला जात आहे. ‘मामी’ महोत्सवात श्रीदेवीने अनामिका खन्नाचा डिझाइन केलेला फ्लोरल प्रिंटचा ड्रेस घातला होता. या ड्रेसला अगदी मॅचिंग असा तिने क्लचही घेतला होता. सगळ्याच गोष्टी अगदी मॅचिंग असल्यामुळे तिच्या या ड्रेसची तुलना बेडशीटशी करण्यात आली. असेही म्हटले जाते की, काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने अशाच पद्धतीचा फ्लोरल ड्रेस घातला होता. श्रीदेवीने घातलेला हा ड्रेस त्याचीच कॉपी आहे.

श्रीदेवीच्या जान्हवी आणि खुशी या दोन मुली बी-टाऊनमध्ये बऱ्याच प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी खुशीचे बीचवरील स्वीमसूट घातलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मोठी बहिणी जान्हवीप्रमाणेच खुशीही लवकरच बी- टाऊनमध्ये येईल अशी चर्चा होत आहे. यापूर्वी खुशीप्रमाणेच शाहरुखची मुलगी सुहाना खानचेही बिकनीमधील फोटो व्हायरल झाले होते.

नृत्यावर आधारित शो ‘झलक दिखला जा’चा दहावा सीझन नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये कलर्स एका अशा परीक्षकाला घेऊन येतोय ज्यामुळे तुम्ही दर आठवड्याअखेर हा शो आवर्जून पाहाल. आता या दहाव्या सीझनमध्ये बॉलिवूडची ‘हवा हवाई’ म्हणजेच श्रीदेवी परीक्षक म्हणून दिसणार असल्याची माहिती मिळतेय. श्रीदेवी तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्यासाठी प्रसिद्ध आहे हे सर्वांनाच माहित आहे. पडद्यावरील श्रीदेवीचं नृत्य डोळ्याची पापणी लवू न देता पाहिलं जातं. त्याचबरोबर तिचे हावभावही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. त्यामुळे परीक्षक म्हणून श्रीदेवीला पाहणे हे तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.