करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या वाढत्या विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाउन जारी करण्यात आला. परंतु या लॉकडाउनमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची.

लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी सोनू सूदने स्विकारली आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बिहारला जायचे आहे. त्यासाठी मदत करण्याची विनंती सोनूकडे केली. या प्रेमवीराला सोनूने देखील गंमतीशीर उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “थोडे दिवस तिच्यापासून दूर राहा. खऱ्या प्रेमाची परीक्षा होईल.” सोनू सूदचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘सेक्रेड गेम्स’मधील अभिनेत्री करोनामुळे बेरोजगार; मोलकरणीला देण्यासाठीसुद्धा नाहीत पैसे

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनूने १ हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

Story img Loader