टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आणि आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. एकेकाळी अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेली अंकिता व्यावसायिक विकी जैन याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे.
विकी जैन मुंबईतील एक व्यावसायिक आणि बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी एकमेकांजवळ आले. दोघांच्याही जवळच्या व्यक्तींना या नात्याबद्दल ठाऊक आहे. नुकताच अंकिताचा वाढदिवस साजरा झाला आणि त्या पार्टीत विकीसुद्धा हजर होता.
अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मालिकेत अंकितासोबत सुशांतची मुख्य भूमिका होती. या मालिकेच्या सेटवरच अंकिता आणि सुशांतची मैत्री झाली. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. सहा वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.