अभिनेत्री मनिषा कोइरालाला कर्करोगातून मुक्तता मिळून नवे आयुष्य मिळाले. २०१३ मध्ये अमेरिकेत तिच्यावर सहा महिने उपचार सुरु होते. कर्करोगमुक्त झाल्यानंतर मनिषाने अनेकांना तिच्या संघर्षकथेतून प्रेरणा दिली. नुकतंच तिने सोशल मीडियावर उपचारादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच बाजूला तिचा आताचा एक फोटो पाहायला मिळत आहे. ‘आयुष्यात मिळालेल्या दुसऱ्या संधीसाठी मी कायमच कृतज्ञ राहीन’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

एका बाजूला रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देणारी तर दुसऱ्या बाजूला बर्फाच्छादित पर्वतावर उभी असलेली मनिषा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. ‘आयुष्यात दुसरी संधी मिळाल्याबद्दल मी कायमच कृतज्ञ राहीन. हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आनंदीपणे जगण्याची संधी तुमच्याकडे आहे’, असं कॅप्शन मनिषाने या फोटोला दिलं आहे.

मनिषा कोईरालाला डिसेंबर २०१२मध्ये गर्भशायाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेली होती. तिथे तिच्यावर जवळपास सहा महिने उपचार चालू होते. जून २०१३ मध्ये ती भारतात परतली.