भारतासाठी १७ वर्षांनंतर मिस वर्ल्ड हा किताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्लरचे सध्या सर्व स्थरांतून कौतुक केले जात आहे. बॉलिवूडपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत साऱ्यांनीच मानुषीचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी मानुषीला ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला. एका रात्रीत स्टार झालेल्या मानुषीबद्दल आता प्रत्येकालाच जाणून घेण्याची इच्छा आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत २ वर्षांपूर्वी मानुषी कशी दिसत होती हे स्पष्ट दिसते.
हा व्हिडिओ मानुषी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असतानाचा आहे. व्हिडिओत मानुषी म्हणते की, ‘देशभरातून झालेल्या वैद्यकीय परीक्षेतून माझी निवड झाली. मी काही १२ तास अभ्यास करणाऱ्यांपैकी नाही. मी १२ वीमध्ये असतानाच आयईपीएमटीच्या अभ्यासाची सुरूवात केली होती. वैद्यकीय परीक्षांमध्ये सर्वात कठीण काही वाटते तर ते फिजिक्स असते, त्यामुळेच तेव्हा मी रवी सरांकडे फिजिक्सच्या क्लासला जायचे.’
Miss Chillar #MissWorld2017 2yrs ago pic.twitter.com/q5LaP4E6ub
— BHAIRAVI GOSWAMI (@bhairavigoswami) November 21, 2017
पुढे मानुषी म्हणते की, ‘मला पडलेल्या प्रश्नांचे निरसन केल्याबद्दल मी रवी सरांचे आभार मानते. परिक्षेच्या आधी कितीही पाठांतर केले तरी जर तुम्हाला त्या विषयाचा गाभा माहित नसेल तर परिक्षेला पाठांतर केल्याचा काहीच उपयोग होत नाही. एकीकडे या परिक्षेची तयारी सुरू असताना मी कॉलेजमधील इतर कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले. तुम्ही फार कष्ट घेऊन काम करण्यापेक्षा युक्तीने अभ्यास केला पाहिजे.’ मानुषीचा हा व्हिडिओ अभिनेत्री भैरवी गोस्वामीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. भैरवीने तिच्या कमेंटमध्ये तिला हा व्हिडिओ एका पत्रकाराने व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे म्हटले.