सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी सकाळी चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ज्या क्षणी त्यांनी घोषणा केली त्याच्या पुढच्याच क्षणाला चेन्नईतील त्या सभागृहाबाहेर एकच जल्लोष पाहायला मिळाला. आपण नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असून, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवण्याचा मानस असल्याचे रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करण्यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाहीर केली. गेल्या कित्येक वर्षांपासून रजनीकांत यांना चाहत्यांची साथ लाभली आहे. अशा असंख्य चाहत्यांच्या सर्व ‘फॅन क्लब’ना एकत्र आणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची भक्कम फौज उभी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही पक्षासाठी कार्यकर्त्यांची भक्कम फळीही तितकीच महत्त्वाची असते. हीच बाब अचूकपणे हेरत आपल्या लोकप्रियतेची वापर करत रजनीकांत यांनी चाहत्यांनाही राजकीय प्रवासात आपल्यासोबत मार्गस्थ होण्याची संधीच देऊ केली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

वाचा : अशिक्षित रजनीकांत यांना फक्त माध्यमांनी मोठे केले, सुब्रमण्यम स्वामी यांची टीका 

रजनीकांत यांच्या चाहत्यांचा आकडा आणि त्यांचे ‘फॅन क्लब’ पाहता जास्तीत जास्त चाहत्यांना संघटित केले जाणार असून, त्यांच्यामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांची विभागणी करुन देण्यात येणार आहे. आपल्या राजकीय प्रवासात चाहत्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले. मी पैसा, प्रसिद्धी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी राजकारणात येत नाहीये. किंबहुना चाहत्यांनी नेहमीच मला अपेक्षेहून जास्त प्रेम देऊ केले आहे, असे त्यांनी सांगितले.