आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज (बुधवारी) मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून भायखळा येथून मोर्चाला सुरूवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले असून मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Maratha Kranti Morcha: मुंबईत भगवं वादळ

या मोर्च्याला फक्त सर्व सामान्यांचाच पाठिंबा आहे असे नाही तर आता कलाकार मंडळीही पुढे येऊन या मोर्च्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने मुंबईत होणाऱ्या मराठी क्रांती मूक मोर्चाला पाठिंबा दिला आहे. रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शिवाजी महाराजांचा घोड्यावर स्वार झालेल्या फोटो शेअर करत एक मराठा लाख मराठा असा संदेश लिहिला आहे. रितेशच्या या ट्विटला २.५ हजारांहूनही अधिक लाइक्स मिळाले आहेत तर ५०० हून अधिक लोकांनी त्याचे हे ट्विट रिट्विट केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबईत पहिल्यांदाच होणारा मराठा क्रांती मूक मोर्चा शांतता व शिस्तीत पार पडावा यासाठी वीस हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी २३ समित्या व उपसमित्या तयार करण्यात आल्या होत्या. मोर्चासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांना त्यांची वाहने नवी मुंबईतील स्थानकांच्या आवारात तसेच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभी करून पुढील प्रवास रेल्वेने करावा लागणार आहे. त्यामुळे हार्बर तसेच मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत.