‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला आघाडीचा अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वीच त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. भावी जोडीदार साजिरी देशपांडेसोबतचा फोटो त्याने फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला होता. शनिवारी अमेय आणि साजिरीचा दिमाखदार संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात अमेयने हिरव्या रंगाची शेरवानी आणि साजिरीने फिकट हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता. दोघांची जोडी यावेळी खूपच सुंदर दिसत होती.
गेल्या १३ वर्षांपासून साजिरी देशपांडेला डेट करणारा अमेय सरतेशेवटी विवाहबंधनात अडकणार आहे. ‘गेली १३ वर्षे ती मला सहन करते आहे आणि यानंतरही ती माझ्यासोबत सुखाने राहू शकेल, असे तिला वाटते. तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावेत आणि मलाही शुभेच्छा द्याव्यात’, असं अमेयने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. अमेय- साजिरीचं हे नातं बऱ्याचजणांच्या माहितीत होतं. कारण, बऱ्याचदा अमेयसोबत साजिरीने काही कार्यक्रमांना हजेरीसुद्धा लावली होती.
PHOTO : दीपिका पदुकोणचा ‘रॉयल’ अंदाज
सोशल मीडियावर साजिरीबद्दलची फारशी माहिती उबलब्ध नसली तरीही तिचे काही फोटो मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. अमेय वाघ हे टेलिव्हीजन आणि वेब विश्वातील एक बरंच गाजलेलं नाव आहे. नुकताच तो ‘मुरांबा’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये त्याने वेब विश्वातील आणखी एक प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या मिथिला पालकर हिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.