कधी स्वयंसेवी संस्थेसाठी निधी, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचं ढोंग तर कधी कॅन्सरग्रस्त असल्याचं सांगून मदत मागणाऱ्यांकडून बऱ्याचदा फसवणूक झाल्याच्या घटना पाहायला मिळतात. अशीच फसवणूक करत अभिनेता अनिकेत विश्वासरावला एका टोळीने लाखोंचा गंडा घातला आहे. स्वत: अनिकेतने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही हकीगत सांगितली.

‘गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबत जे घडतंय ते तुम्हाला सांगावं यासाठी मी फेसबुक लाइव्ह करत आहे. मी अतिशय उद्विग्न मनस्थितीत आहे. आजकाल एनजीओ, म्युच्युअल फंड गुंतवणूक, कॅन्सरग्रस्तांसाठी मदत मागणारे लोक भेटतात. पण त्यांचा नेमका हेतू काय हे आपल्याला समजत नाही. आपण त्यात अडकतो आणि पैशांचं नुकसान होतं. माणुसकीवर विश्वास राहत नाही. असंच माझ्यासोबत घडलंय. या गोष्टींना मी बळी पडलोय आणि माझं लाखोंचं नुकसान झालंय. माझ्या बाबतीत जे झालं, ते तुमच्या बाबतीत होऊ नये. तुम्ही सतर्क राहा,’ असं त्याने या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं.

Video : बेपत्ता असल्याच्या चर्चांनंतर कॉमेडियन सिद्धार्थने पोस्ट केला ‘हा’ व्हिडिओ

अविनाशची कशाप्रकारे फसवूणक करण्यात आली हे सुद्धा त्याने स्पष्ट केलं. ‘एक टोळी आहे, जी अजूनही सक्रीय आहे. ते बळीचा बकरा शोधून त्याला गंडा घालतात. त्या टोळीत एक मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक कुरळ्या केसांचा मुलगा आहे. माझ्याकडून फोन नंबर घेऊन काहींशी संपर्क त्यांनी साधला आहे. माझं फेसबुक अकाऊंट हॅक करून मेसेजही केले आहेत. चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव यांनी मला याबाबतची कल्पना दिली. मी पोलिसांशी संपर्क केला असून, तपास सुरु आहे,’ असंही त्याने सांगितलं.