गणेश उत्सव कोणाला आवडत नाही? सर्वांचेच लाडके बाप्पा काही दिवसांसाठी आपल्या घरी विराजमान होतात आणि सर्वत्र चैतन्य, उत्साहाची लाट पसरते. पण, गेल्या काही वर्षांपासून या उत्सवामध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या दिखाव्याचं प्रस्थ वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही कुठेतरी उत्सवाचा अतिरेक होत असल्यामुळे हा सर्व प्रकार कुठेतरी थांबवण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. याच गरजेतून ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ ही संकल्पना उदयास आली. पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करुन बाप्पाचं विसर्जनही त्याच पद्धतीने करण्याला अनेकांनीच प्राधान्य दिलं. यामध्ये कलाकार मंडळींचा विशेष पुढाकार असल्याचं पाहायला मिळालं. यामधीलच एक नाव म्हणजे हेमंत ढोमे.

हेमंतने त्याच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. गणपती बाप्पांचं विसर्जन करतेवेळीचा हा व्हिडिओ असल्याचं पाहताक्षणी लक्षात येतंय. पण, इथे लक्षवेधी बाब म्हणजे हेमंतच्या बाप्पांची मूर्ती कुठेच दिसत नाहीये. कारण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही असल्यामुळे हेमंतच्या कुटुंबियांनी बाप्पांच्या मूर्तीऐवजी सुपारीचं विसर्जन केलं आहे. घरातील एका झाडाच्या कुंडीत या सुपारीचं विसर्जन करुन हेमंतने इतरांनाही आपल्या या कृतीचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं आहे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता त्याने बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत निरोप दिल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

‘आमच्या घरी होणारं बाप्पाचं इको फ्रेंडली विसर्जन… तुम्हीसुद्धा करा आणि इतरांना सुद्धा करायला लावा. प्रदुषण टाळा… बाप्पाने ही सृष्टी निर्माण केलीय म्हणता ना? मग बाप्पासाठीच तिचा विनाश करु नका’, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ पोस्ट केलाय. हेमंतने पोस्ट केलेला हा व्हिडिओ काहीजणांनी शेअरही केला आहे. त्यामुळे एका अर्थी त्याने केलेलं हे आवाहन लोकांपर्यंत पोहोचत आहे असंच म्हणावं लागेल.