गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशी आता एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. प्रियकर, मित्र अशा रुपांमध्ये झळकलेला स्वप्नील आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. खलनायकी रुपातील स्वप्नीलचा लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘रणांगण’ चित्रपटाच्या निमित्ताने हा मराठी सिनेसृष्टीचा नायक आता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
समंजस, रोमँटीक भूमिका साकारून तरूणींच्या मनात घर करणारा स्वप्नील जोशी ‘रणांगण’च्या निमित्ताने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याने साकारलेल्या खलनायकाला प्रेक्षकांनी पसंती मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रणांगणात सुरू असलेलं एक वेगळंच युध्द या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ज्यामध्ये स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त अभिनेता सिध्दार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे अशी दिग्गज कलाकारांची फौज चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

वाचा : अभिनय नव्हे, तर ‘या’ श्रेत्रात करिअर करण्याचा श्रीदेवी यांच्या मुलीचा निर्णय

‘५२ विक्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि ‘ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट’ मीडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित ‘रणांगण’ या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. राकेश सारंग यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, ११ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.