‘डॉल्बी’ला मागे टाकत ढोल ताशांनी आपली जुनी ओळख नव्याने समाजासमोर आणली आहे. गणेशोत्सव मिरवणुकीची ‘ढोल-ताशा’ ही एक नवी ओळख झाली आहे. लयबद्ध तालावर एका रांगेत, समान वेशभूषा धारण केलेल्या ढोलताशा पथकाला पाहिलं की पाय आपोआपच थिरकू लागतात. यंदाच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुकीत पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती समोर सर्व ढोलताशा पथकाच्या पुढय़ात हा ‘कलावंत’ ढोल-ताशा ‘सेलिब्रेटी’ ठरला.

सर्वच शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या आराधनानेच होते. श्रीगणेश आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. मग आपण सर्व कलाकारांनी एकत्र मिळून गणरायासाठी काहीतरी करावे, त्याची किमान एक दिवस तरी सर्वानी सेवा करावी. यातून सर्व कलाकारही एकत्र येतील, अशी कल्पना फेब्रुवारी २०१४ मध्ये अभिनेता आस्ताद काळेच्या मनात आली. लगेच आस्तादने सामाजिक माध्यमांवर ही कल्पना मांडली व त्याच्या कल्पनेला सर्व कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, बॅक स्टेज कलाकारांचा पाठिंबा मिळाला. व्यग्र व धावपळीच्या वेळापत्रकातून सर्वानाच एकत्र येण्याचे व्यासपीठ आस्तादने खुले करून दिले.

कलावंत ढोल ताशा पथकाविषयी आस्तादने सांगितले, सर्व कलाकार केवळ पुरस्कार सोहळ्याला किंवा पार्टीला कधीतरी एकत्र येतात. पण वर्षांतून किमान एक दिवस निश्चित असावा जो सर्व कलावंतांना एकत्र आणेल व नेहमीपेक्षा वेगळा असेल. गणपती विसर्जन मिरवणुकीत ‘ढोल ताशा’ हे पुण्याचे खास वैशिष्टय़ आहे. आपल्या सर्व कलाकारांचेही असे एखादे ढोल-ताशा पथक असेल तर किती छान होईल, असा विचार मनात पिंगा घालू लागला व त्यातून ही कल्पना सूचली. अपेक्षेपेक्षाही खूप चांगला प्रतिसाद सर्व कलाकारांकडून मिळाला आणि २०१४ मध्ये कलावंत ढोल ताशा पथकाची स्थापना झाली. आमच्या या पथकात सर्व लहानमोठे कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, बॅक स्टेज कलाकार, संगीतकार आहेत. म्हणून आम्ही या पथकाचं नाव ‘कलावंत’ असे ठेवले आहे.

यंदाच्या वर्षी या पथकात ७० कलाकार सहभागी झाले होते. पथकातील बऱ्याच कलाकारांना वाद्ये वाजवता येत नाही. त्यासाठी दर वर्षी ३५ दिवसआधी तालीम घेण्यात येते. यंदाच्या वर्षी तालमीची धुरा अमित रानडे व सुजय नातू यांनी सांभाळली. लहानपणापासून ढोल ताशा पथकात असल्याने मी उत्तम ढोल वाजवू शकतो. सर्व कलाकार सदस्यांच्या ‘थापी’कडे मी लक्ष ठेवून असतो. अनेकदा या ‘थापी’मुळे मनगटातून रक्त देखील येते. माझ्या कडक शिस्तीमुळे काही वेळा माझे कलाकार मित्र माझ्यावर चिडतातही. तालिमीबरोबरच पारंपरिकता जपण्याचाही आमचा प्रयत्न असतो, असेही आस्तादने सांगितले.

गेली दोन वर्ष पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपती समोर वादन करण्याची संधी या पथकाला मिळाली. पण यंदाच्या वर्षी मनाच्या पहिल्या गणपतीच्या समोर वादन करण्याचे भाग्य या पथकाला मिळाले. ढोल-पथकांसाठी प्रशासनाकडून घातल्या गेलेल्या सर्व नियमांचे पालन पथकाकडून केले जाते. पारंपरिक पद्धतीचे वादन करत असतानाच वेगवेगळ्या संकल्पना घेऊनही हे कलावंत पथक ढोल-ताशा वादन करते.

मी लहानपणापासून ढोल ताशा पथकात सहभागी व्हायचो. परंतु कलावंत ढोल ताशा पथक म्हणजे माझ्यासाठी एक तणावमुक्त होण्याचे साधन आहे. मी या पथकात ताशा वाजवतो. आमचे हे पथक सर्वासाठी दरवर्षी खुले असते. आमच्यावर प्रेम करणारे चाहतेदेखील आमच्याबरोबर पथकात वादन करतात. आम्हाला त्यांना व त्यांना आम्हाला जवळून पहाण्याची संधी मिळते   – सौरभ गोखले, अभिनेता

मी ज्ञान प्रबोधिनीची विद्याíथनी. आमच्या शाळेत मुलींचे एक वेगळे ढोलताशा पथक होते. दोन वर्षे मी त्या पथकात वादन केले. शालेय जीवनापासूनच ही परंपरा बघत आले होते. कलावंत या ढोल ताशा पथकामुळे मला पुन्हा एकदा वादनाची संधी मिळाली. मी तालमीसाठी फार वेळ देऊ शकत नाही. पण तरीही आपली मराठमोळी परंपरा जोपासण्यासाठी पथकात दरवर्षी सहभागी होते.  – अनुजा साठे-गोखले, अभिनेत्री.

मी पक्का पुणेकर आहे. लहानपणापासून ढोलताशा पथकात माझा सहभाग असायचा. पण कलावंत ढोलताशा पथकामुळे माझी नवी खेळी पुन्हा नव्याने सुरू झाली. गेली तीन वर्षे मी या पथकात ढोल वाजवीत आहे. आमच्या या पथकात कोणतेही हेवेदावे किंवा भांडण नाही. गेल्या तीन वर्षांपासून आमच्या पथकाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  – तेजस कर्वे, अभिनेता

– मितेश जोशी

 

 

Story img Loader