मराठी प्रेक्षकांचे जेवढे नाटकांवर प्रेम आहे तेवढेच त्यांचे सिनेमावरही प्रेम आहे. ९० च्या दशकांत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांचा माहेरची साडी हा सिनेमा कोणी पाहिला नसेल असा एकही माणूस भेटणार नाही. हा सिनेमा तेव्हाचा सुपर हिट सिनेमा होता. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तेव्हा तब्बल १२ कोटींची कमाई केली होती. आजही हा सिनेमा जर टीव्हीवर लागला तर तो पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. या सिनेमामुळे अभिनेत्री अलका कुबल यांनाही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते.
निर्माते विजय कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येणार असल्याची घोषणा केली होती. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार म्हटल्यावर अलका कुबल यांची भूमिका कोणती अभिनेत्री चांगल्याप्रकारे निभावू शकते हा प्रश्न खुद्द कुबल यांनाच विचारण्यात आला.
एकीकडे या सिनेमाच्या नायिकेसाठी शोध सुरू असताना कुबल यांनी मात्र अमृता खानविलकरच्या नावाला पसंती दिली आहे. तिचे बाजी सिनेमातील काम कुबल यांना फार आवडले असून ती ही भूमिका इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने वठवू शकते असे त्या म्हणाल्या.
नेहमीच आपल्या ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी अमृता खानविलकर ही भूमिका स्वीकारेल का असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. भावा- बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारित या सिनेमात अलका कुबल यांच्यासोबतच विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
माहेरची साडीमध्ये अलका शेवटी मरते असं दाखविण्यात आलं होतं. ती गेल्यानंतर तिने जन्म दिलेल्या मुलाचं आणि तिच्या कुटुंबाच काय झालं असेल? या अनुषंगाने आता हा पुढचा सिनेमा सुरु होईल, असे विजय कोंडके यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले होते.